प्रतिनिधी/
*राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट*
*उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय*
राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते*.
ह्यासंदर्भात राज्याचे उद्योग विभागाचे सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी कॅबिनेट समोर प्रस्ताव सादर केला.
सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात मोठया प्रमाणात प्राणवायूचा (Liquid Medical Oxygen) (LMO) तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत 1300 मे.टन/प्रतिदिन असताना 1800 मे.टन एवढया प्राणवायूची मागणी आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे सदर मागणी 2300 मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सीजन निर्मिती व साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट, इत्यादी उपाययोजना करुन राज्य ऑक्सीजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी व आवश्यक ऑक्सीजन निर्मितीचे उदिष्ट साध्य करण्याकरीता, राज्यामध्ये “ *मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजुर करण्याचा व याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला*. उद्योग मंत्री सुभाष देसाई ह्यांनी हा खूप महत्वाचा आणि लोकांच्या अतिशय फायद्याचा निर्णय असल्याचे विशद केले.