नीरा नरसिंगपूर: दिनांक 30
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे अवैधरित्या दारूचे अंदाजे 10 ते 15 व्यवसाय आहेत. या व्यवसायामुळे गावातील आणि पंचक्रोशीतील लोक हे दारू पिऊन गावामध्ये शिवीगाळ करणे, आरडाओरडा आणि गोंधळ करणे असे प्रकार करतात याच्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या भक्तांना आणि भाविकांना याचा खूप मोठा त्रास होतो. येथील दारू विक्रेत्यांना हा बड्या बड्या राजकीय हस्तकांचा वरदहस्त असल्यामुळे ते गावातील लोकांना व महिलांना तसेच ग्रामपंचायत यांना न जुमानता अगदी राजरोसपणे दारूविक्रीचा व्यवसाय करत आहेत.
या दारू मुळे अनेक लोकांचे संसार मोडलेले आहेत अनेक माता-भगिनी ह्या आपली घरे सोडून माहेरी गेलेले आहेत तसेच दारू पिणारा माणूस हा घरातील लोकांना त्रास देणे तेवढेच काम करतो. बरेचदा महिला तक्रार करूनही ग्रामपंचायत असो किंवा गावातील पुढारी मंडळी असो दारू बंदीसाठी कोणीही पुढे येत नाही याच्यामुळे दारू विक्रेते यांना अभय मिळत आहे. त्यांना जर कोणी दारूबंदी विषयी बोलले तर ते सरळ सरळ सांगतात की आम्ही कोणाला घाबरत नाही आणि पोलिस प्रशासन ही आमच्या ऐकण्यात आहे आणि आम्ही त्यांना घाबरत नाही. नीरा नरसिंगपूर गावातील व पंचक्रोशीतील महिला भगिनींची एकच इच्छा आहे की आम्हाला या दारूपासून मुक्ती मिळावी आणि कोणीतरी गावाला वाली मिळावा आणि आमच्या गावातील दारूबंदी लवकरात लवकर व्हावी यासाठी या महिला लवकरच नीरा नरसिंगपूर येथील नरसिंह मंदिराच्या समोर तसेच बावडा पोलीस स्टेशन आणि इंदापूर तहसील कार्यालयामध्ये धरणे आंदोलन आणि उपोषण करणार आहेत.
