मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 8/7/2021:-
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस श्रेष्ठी संग्राम अनंतराव थोपटे यांच्यासह राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचाही विचार करीत आहेत. दलित चेहरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नितीन राऊत यांचा सामाजिक व राजकीय संघर्ष माहिती आहे का?
नितीन राऊत यांची कौटुंबीक पार्श्वभूमी : डॉ. नितीन काशिनाथ राऊत हे राऊत यांचे पूर्ण नाव आहे. नागपूरमध्ये 9 ऑक्टोबर 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. स्वातंत्र्याचा लढाईत सक्रिय असलेले त्यांचे वडील मिल मजूर तर आई गृहिणी होती.
नितीन राऊत यांचे शिक्षण किती? : नितीन राऊत यांचे प्रेरणास्त्रोत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे राऊत यांनी उच्च शिक्षण घेतले नसते तर नवलंच. त्यांनी बीएस्सी पूर्ण केल्यावरही ज्ञानोपासना जोपासली. “आंबेडकर थॉट्स”मध्ये एम. ए. व नंतर पीएचडी पूर्ण केली. त्यांनी नाट्य विषयात मास्टर ऑफ फाईन आर्ट्स देखील केले. ते कमर्शियल पायलटही होते.
पुस्तकांचे लिखाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितीन राऊत यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी त्याचा संबंध’ यासारख्या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. बुद्ध-आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी एकूण चार पुस्तके लिहिली आहेत.
सामाजिक क्षेत्रात पदार्पण : नितीन राऊत यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. कोणताही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना त्यांनी या सर्वांवर मात करत स्वतःचे प्रस्थान उभे केले. दलित पँथर चळवळीत ते सक्रिय होते. सत्तरच्या दशकात दलित पँथर चळवळीने जोर धरला होता. दलित अत्याचाराविरोधात उभ्या ठाकलेल्या या चळवळीत त्यावेळचे तरुण ओढले गेले होते. विदर्भात अनेकांनी पँथर वाढवली. राऊतही तरुण वयात या चळवळीकडे ओढले गेले. मराठवाडा नामांतर आंदोलन ते खैरलांजी आंदोलनापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
राजकीय कारकिर्द : 1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद भूषवले आहे. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी नितीन राऊतांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत ते 20 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. सध्या ते काँग्रेसच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष व राज्याचे कार्याध्यक्ष आहेत. काँग्रेसला विदर्भात सर्वात जास्त अनुकूल वातावरण असते. ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फारसे प्रयत्न न करताही काँग्रेसला 15 जागा मिळाल्या.
नितीन राऊत यांनी केलेली कामे :
▪️सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना नितीन राऊत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे 2004 मध्ये दलित आणि मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण मिळाले होते. म्हणूनच आज पदोन्नती आरक्षण रद्द झाल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते.
▪️मराठवाडा नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग
▪️पर्यावरण, दारुबंदी, व्यसनमुक्ती, व्यवसायिक शिक्षण, युवकांना मार्गदर्शन
▪️भारत सरकारच्या राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोग स्थापन्यासाठी प्रयत्न
➤ 1987 मोफत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करुन लाखो अनुयायांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय, प्रसाधन गृहे, स्नानगृहे उभी केली, 2.5 लाख लोकांच्या विश्रांतीसाठी मंडपाची सोय केली.
➤ 1988 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेसाठी आयोजन
➤ 1989 राष्ट्रीय एकात्मतेसाठी नागपूर ते रायपूर भीमज्योत यात्रेचे आयोजन
➤ 1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नागपूर येथील कस्तूरचंद पार्क येथे भव्य रॅलीचे आयोजन
➤ 1990 नागपूर जिल्ह्यातील मकर-धोकडा येथील जातीय दंगलीतील दंगलग्रस्तांना मदत
➤ 1991 मोवाड आणि नागपूर येथील पूरग्रस्तांना मदत कार्य आणि 15 दिवस अन्नदान
➤ 1989 राष्ट्रीय एकात्मतेसाठी नागपूर ते रायपूर भीमज्योत यात्रेचे आयोजन
▪️स्वतंत्र विदर्भाचे समर्थक, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील
▪️संसद आणि राज्य विधानसभेत, अनुसूचित जातीसाठींच्या राखीव जागांच्या संख्येइतकी वाढ करण्याची राज्य शासनाची शिफारस मिळविण्यासाठी प्रयत्न
▪️19 एप्रिल 2000 संविधान बचाओ रॅलीचे आयोजन, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मागासवर्गीय अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न
▪️पददलितांच्या उद्धारासाठी “संकल्प” संस्था सुरु करुन या संस्थेमार्फत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम
▪️जातीय दंगली, पूरग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत
▪️दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी सक्रिय सहाय्य
▪️महिला आणि बालकल्याण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोफत प्रदर्शन, जनजागृती शिबिरांचे आयोजन
पुरस्कार आणि सन्मान :
★ मोरवाडा येथील पूरग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वनराई संस्थेमार्फत पुरस्काराने सन्मानित
★ रत्नागिरी येथे आरक्षण विधेयकासाठी सन्मानित
त्यांच्याकडे असणारी पदे : अध्यक्ष, अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती शिकाऊ विमानचालक संघटना .अध्यक्ष, पिपल्स प्रोग्रेसिव्ह सोसायटी, नागपूर
.अध्यक्ष, राज्य परिवहन सल्लागार समिती . अध्यक्ष, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार समिती . विश्वस्त, नागपूर सुधार प्रन्यास. सदस्य, गृह विभाग कामकाज स्थायी समिती
सल्लागार, महाराष्ट्र राज्य वनपाल व वनरक्षक संघटना व वेस्टर्न कोलफिल्डस् लि. अनुसूचित जाती/जामाती कर्मचारी कल्याण संघटना
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य.