अमरावती :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 26 जुन 2021:-
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने एका खाजगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. त्याबदल्यात खाजगी कंपनीने बँकेला ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे शुक्रवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तपासणी सुरू केली आहे. आर्थिक घोटाळ्याशी संबंधित असणारी सर्व कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेली आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हा उपनिबंधक, संदीप जाधव यांनी १५ जून रोजी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाच अधिकारी, कर्मचारी व सहा ब्रोकर्स यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा तपास शहर कोतवाली पोलिसाकडून, आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्यानुसार प्राथमिक चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी बचाटे हे आपल्या सहकारी अधिकाऱ्यासह, शुक्रवारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंगेश कोलवाडकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली. नंतर बँकेतील अधिकारी, नितीन दामले यांच्यासोबत बँकेच्या तळमजल्यावरील लेखा शाखेत जाऊन चर्चा करून, संबंधित प्रकरणाचे दस्तऐवज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बँकेमध्ये आल्याची माहिती समजताच बँकेत सगळीकडे धावपळ चालू झाली होती. साधारणपणे एक तास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक बँकेची तपासणी करत होते. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर, अगोदर त्याची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी अटकसत्र सुरू करण्यात येईल, अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.